Monday, May 13, 2013

उन्हाळ्यात घ्यायची काळजी



 
 
झळा ज्या लागल्या जीवा... मग देहाच्या केवळ बाह्य भागाला थंडावा देऊन काय उपयोग होणार? या वाढत्या उष्णतेने शरीराच्या आत अस्वास्थ्य निर्माण होऊ नये, याची काळजी घ्यायला हवी. नाही तर नुसती तगमग वाट्याला यायची. अंतर्बाह्य उन्हाळा रोखायचा असेल तर विशेष उपाययोजना करायला हवी. लक्षात ठेवा, कुठलाही कोरडेपणा वाईटच. जगण्यासाठी ओलावा हवा... तनात... मनात.

उन्हाळ्याची झळ सर्वांच्याच परिचयाची असते. सध्या तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे दिवसेंदिवस उन्हाळा असह्य होऊ लागला आहे. पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्र्या, रेनकोट असतात; हिवाळ्यातील थंडीपासून बचाव व्हावा म्हणून मफलर, स्वेटर, पायमोजे, शेकोट्या मदतीला असतात. उन्हाळ्यात मात्र उपाययोजना करणे अवघड असते. पंखे, कूलर, .सी. वगैरेंच्या साह्याने बाह्यतः थंडावा अनुभूत करता आला तरी बरोबरीने अत्याधिक वाढलेल्या उष्णतेचा शरीरावर दुष्परिणाम होऊ नये अस्वास्थ्य निर्माण होऊ नये यासाठी काही विशेष उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

बदल शरीरातील
सर्वप्रथम उन्हाळ्यामुळे शरीरात काय बदल होतात ते आपण थोडक्यात पाहू.
उन्हाळा येतो हिवाळ्यानंतर. जसजशी थंडी कमी कमी होत जाईल तसतशी जाठराग्नीची शक्ती अर्थात पचनशक्ती कमी कमी होत जाते. वाढलेल्या उष्णतेने जसे नद्या, झऱ्यांचे पाणी कमी होते, विहिरी खोल जातात, तसेच शरीराचे प्रीणन करणारा, तृप्ती देणारा रसधातूही अशक्त होतो. अर्थातच रूक्षता वाढते, शरीरशक्ती कमी होते; थकवा, निरुत्साह जाणवायला सुरवात होते.

अर्थातच उन्हाळ्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल. खाण्यापिण्यात, वागण्यात, औषधात असे बदल करायला लागतील, की जेणेकरून होणाऱ्या बदलांमुळे अस्वास्थ्य निर्माण होणार नाही.

उन्हाळ्यातील उष्णता अनेक प्रकारच्या त्रासांना आमंत्रण देऊ शकते. यातील सर्वसाधारणतः आढळणाऱ्या काही त्रासांचा प्रतिकार कसा करावा, याची आज आपण माहिती घेणार आहोत.

त्रासांचा प्रतिकार
उन्हाळ्यात घाम येण्याचे प्रमाण वाढणे साहजिक असते. शरीराचे तापमान आटोक्यात राहील यासाठी खरे तर ही निसर्गाने केलेली योजना असते. मात्र कपडे ओले होतील इतका घाम येणे, घामाला एक प्रकारचा तीक्ष्ण गंध असणे फारच त्रासदायक असते. हे टाळण्यासाठी स्नानाच्या वेळी कुळथाचे पीठ, वाळा, अनंतमूळ, नागरमोथा वगैरे द्रव्यांपासून तयार केलेले उटणे लावण्याचा उपयोग होतो. स्नानानंतर काखेमध्ये किंवा अतिप्रमाणात घाम येणाऱ्या इतर ठिकाणी तुरटीचे बारीक चूर्ण लावण्याचाही उपयोग होतो. घामट कपडे वेळेवर बदलणे, आवश्यकता वाटल्यास नवीन कपडे घालण्यापूर्वी अंग पाण्याने पुसून घेणे, हेही आवश्यक असते.

संवेदनशील त्वचा असणाऱ्यांना- विशेषतः लहान मुलांना उन्हाळ्यात घामोळे येताना दिसते. यावर दूर्वांचा रस लावण्याचा किंवा शतधौतघृत लावण्याचा उपयोग होतो. अनंतमूळ चंदन यांचे बारीक वस्त्रगाळ चूर्ण भुरभुरण्यानेही घामोळे कमी होताना दिसते.

सूर्याच्या तीव्र किरणांचा ज्या ज्या ठिकाणी स्पर्श होतो, त्या ठिकाणची त्वचा काळवंडण्याची शक्यता असते. सर्वप्रथम टोपी, स्कार्फच्या साह्याने तीव्र सूर्यकिरणांपासून शक् तेवढे संरक्षण करण्याचा प्रयत्न करायला हवाच, पण बरोबरीने उन्हाळ्यात चेहऱ्यावर दुधावरची साय लावून ठेवण्याचाही उपयोग होतो.

दूर्वांच्या हिरवळीवर चाला
उन्हाळ्यात हाता-पायांची आग होणे हीसुद्धा मोठ्या प्रमाणावर आढळणारी तक्रार असते. यावर सर्वांत उत्तम उपाय म्हणजे पादाभ्यंग करणे. आठवड्यातून दोन-तीन वेळा पादाभ्यंग करण्याने उष्णता कमी होते. उपलब्धता असल्यास दूर्वांच्या हिरवळीवर सकाळ-संध्याकाळ अनवाणी पायांनी चालण्याने तळपायांचा दाह कमी होण्यास मदत मिळते.

उन्हाळ्यात संपूर्ण अंगाचाही दाह होऊ शकतो. अशा वेळी कलिंगडाच्या सालीच्या आत असणारा पांढरा गर अंगावर लावण्याचा उपयोग होतो. कलिंगड अर्धे कापून आतला गर काढून घेतल्यानंतर राहणारी हेल्मेट टोपी डोक्यावर ठेवल्याने डोक्यातील उष्णता कमी होते.

गुलकंद मोरावळा हे दोन आयुर्वेदिक योग म्हणजे उन्हाळ्यातील वरदानच होत. देशी गुलाबाच्या गुलाबी नाजूक पाकळ्या खडीसाखरेपासून सूर्याच्या उष्णतेच्या साह्याने तयार केलेला शुद्ध गुलकंद, तोही जर प्रवाळयुक् असला तर त्यामुळे उष्णतेचा त्रास निश्चित कमी होतो.

मेंदीची ताजी पाने वाटून तयार केलेला लेप तळपाय तळहातांवर लावण्यानेही आग कमी होते.

पाणी आणि सरबते
उन्हाळ्यामध्ये उन्हाळी लागणे म्हणजे लघवीची जळजळ होणे, लघवी कमी प्रमाणात होणे वगैरे त्रास होऊ शकतात. यावर धन्या-जिऱ्याचे पाणी पिण्याचा, साळीच्या लाह्यांचे पाणी पिण्याचा उपयोग होतो. उशिरासव, शहाळ्याचे पाणी, प्रशांत चूर्ण वगैरे घेणेही चांगले. उन्हाळ्यात शरीरातील जलांश कमी होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. यामुळेच उन्हाळ्यात सरबत पिण्याची पद्धत असते. मात्र बाजारात मिळणारी चंदन-वाळ्याची सरबते ही सहसा रासायनिक द्रव्ये अनैसर्गिक रंग टाकून तयार केलेली असतात. यामुळे सरबताचा खरा फायदा होत नाही.

लिंबू सरबत किंवा कोकम सरबत तर प्रसिद्ध आहेतच, पण वाळा-चंदनाचे आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेले पेयही उन्हाळ्यात उपयोगी ठरते. मातीच्या छोट्या माठामध्ये ग्लासभर पाणी, अर्धा चमचा वाळ्याचे चूर्ण अर्धा चमचा चंदनाचा चुरा भिजत घालावा. सकाळी हे सर्व मिश्रण हाताने कुस्करावे किंवा रवीने घुसळावे गाळून घ्यावे. त्यात चमचाभर खडीसाखर मिसळून प्यावे. अशा सरबताने शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते, तहान शमते, ऊन लागत नाही उन्हाळा सुसह्य होतो.

रात्री मुगाचे कढण
कधी कधी उन्हाळ्यात रात्री फारशी भूक लागत नाही, अशा वेळी मुगाचे कढण प्यावे. मूग वीर्याने थंड असून, पचायला हलके असतातच, पण ताकद कायम ठेवणारेही असतात. मुगाचे कढण बनवण्याची पद्धत अशी - अर्ध्या वाटी मुगाच्या डाळीत आठ कप पाणी, आवळकाठीचे पाच-सहा तुकडे, पाच-सहा मनुका चवीपुरते सैंधव घालून शिजवावे. योग्य प्रकारे शिजल्यावर गाळून घेऊन प्यावे. याने उन्हाळ्यात होणारा पित्ताचा त्रास म्हणजे हाता-पायाच्या तळव्यांची रसरस होणे, डोळे जळणे, लाल होणे, एकसारखी तहान लागणे वगैरे लक्षणे कमी व्हायला मदत होते.

पचनशक्ती कमी झालेली असल्याने उन्हाळ्यात प्यायचे पाणी उकळून प्यावे. त्यावरही शीततेचा संस्कार व्हावा म्हणून पुढील प्रयोग करावा- वाळ्याचे बारीक तुकडे, चंदनचुरा, बडीशेप, धने वगैरे गोष्टी समप्रमाणात एकत्र कराव्यात (जलसंतुलन). पाणी उकळताना वरील मिश्रण पाच लिटर पाण्याला अर्धा चमचा या प्रमाणात टाकावे. उकळी आल्यावर मंद आचेवर दहा मिनिटे ठेवून नंतर निवू द्यावे. नंतर गाळून मातीच्या घड्यात भरून ठेवावे. मातीच्या घड्याला बाहेरून ओले फडके गुंडाळून ठेवल्यास पाणी अधिक गार होते. मातीचे भांडे कोरे नसल्यास या पाण्याने कधीच त्रास होत नाही.

उन्हाळ्यात डोळ्याची जळजळ होणेही स्वाभाविक असते. झोपण्यापूर्वी बंद डोळ्यांवर शुद्ध गुलाबजलाच्या घड्या ठेवण्याचा किंवा गाळून घेतलेल्या थंड दुधाच्या घड्या ठेवण्याचा उपयोग होतो. पादाभ्यंग करण्याचा, तसेच नाकात साजूक तुपाचे दोन-तीन थेंब टाकण्याचाही फायदा होतो.

उन्हाळ्यामध्ये शरीरात उष्णता वाढली की त्याच्या पाठोपाठ कोरडेपणाही वाढतो. यामुळे बऱ्याचदा मलावष्टंभाचा, त्यातूनच मूळव्याधीचा, शौचावाटे रक् पडण्याचा त्रास होऊ शकतो. यासाठी उन्हाळ्यात सुरवातीपासूनच अविपत्तिकर चूर्ण किंवा सॅनकूल चूर्ण घेणे चांगले. अधूनमधून दोन-तीन चमचे एरंडेल तेल घेऊन आतड्यातील कोरडेपणा कमी करणे, आहारात दूध, घरचे लोणी, साजूक तूप यांचा समावेश करणेही चांगले.

अशा प्रकारे उन्हाळ्यामुळे निसर्गात पर्यायाने शरीरात होणाऱ्या बदलांचे सुरवातीपासून भान ठेवले तर उन्हाळ्याचा त्रास होणार नाही, उलट उन्हाळा कधी संपला हे कळणारही नाही.

No comments:

Post a Comment