Monday, May 13, 2013

बालसंस्कार - Day of birth



बाळाचा जन्म ही आनंदोत्सवाची सुरवात असते; मात्र चांगले संस्कार करण्यासाठी बालपण हा सर्वोत्तम काळ असतो. बाळ जन्माला आले की करायला हवेत असे अनेक संस्कार आयुर्वेदात सांगितलेले आहेत. यांना "जातकर्म संस्कार' असे म्हटले आहे. यामध्ये बाळाचा श्वासोच्छ्वास नीट चालू होणे, योग्य वेळी योग्य ती काळजी घेऊन नाळ कापणे, बाळाच्या शरीराची शुद्धी करणे वगैरे गोष्टींचा समावेश असतो. बालकाच्या आरोग्यरक्षणाच्या दृष्टीने आयुर्वेदाने सांगितलेल्या पद्धतीने हे संस्कार व्हायला हवेत. जन्मतःच असे उत्तम संस्कार मिळाले, प्रसन्न वातावरणाचा अनुकूल परिणाम मिळाला, की त्यामुळे बालकाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागेल.

बाळाचा जन्म ही आनंदोत्सवाची सुरवात असते; मात्र चांगले संस्कार करण्यासाठी बालपण हा सर्वोत्तम काळ असतो. बाळ जन्माला आले, की करायला हवेत असे अनेक संस्कार आयुर्वेदात सांगितलेले आहेत. यांना "जातकर्म संस्कार' असे म्हटले आहे.

यामध्ये बाळाचा श्वासोच्छ्वास नीट चालू होणे, योग्य वेळी योग्य ती काळजी घेऊन नाळ कापणे, बाळाच्या शरीराची शुद्धी करणे वगैरे गोष्टींचा समावेश असतो. सध्या बहुधा या सर्व गोष्टी दवाखान्यातील तज्ज्ञांकरवीच केल्या जातात, तरीही बालकाच्या आरोग्यरक्षणाच्या दृष्टीने आयुर्वेदाने सुचवलेल्या ज्या गोष्टी करायलाच हव्यात, त्या याप्रमाणे होत-
जन्मानंतर लगेच रडणे हे त्याच्या आरोग्याचे द्योतक असते. रडायला सुरुवात झाली म्हणजे श्वासोच्छ्वासाची क्रिया सुरू झाली, बाळाच्या शरीरात रक्ताभिसरणाची क्रिया वेगळ्या प्रकारे सुरू झाली. एकदा हे घडले, की बाळाच्या उजव्या कानात खालील मंत्र म्हणायला सांगितला आहे.

आदात्संभवसि हृदयादभिजायसे आत्मा वै पुत्रनामासि जीव शरदां शतम्।।
शतायुः शतवर्षोऽसि दीर्घमायुरवाप्नुहि नक्षत्राणि दिशो रात्रिरहश् त्वाभिरक्षतु ।।
...
अष्टांगसंग्रह उत्तरस्थान

या मंत्रात बालकाच्या दीर्घायुष्याची, आरोग्याची रक्षणाची प्रार्थना केलेली आहे.
नाळ कापण्याआधी
नाळ कापायच्या आधी बालकाच्या टाळूवर स्निग्ध द्रव्याचा पिचू ठेवायला सांगितला आहे.

प्रथमं प्रमार्जितास्यस्य चास्य शिरस्तालु कार्पासपिचुना स्नेहगर्भेण प्रतसंछादयेत् ...चरक शारीरस्थान

बालकाच्या शरीराची स्वच्छता करण्यापूर्वीच त्याच्या टाळूवर तुपात भिजविलेल्या कापसाचा बोळा ठेवावा. टाळू भरण्याचे महत्त्व आपण सर्व जण जाणतोच. कापसाचा बोळा तुपात भिजवून ठेवण्यामागे टाळू कायम स्निग्ध राहावा सातत्याने टाळूमध्ये तूप जिरत राहावे ही योजना केलेली आहे. अर्थातच मेंदूच्या विकासासाठी याचा खूप उपयोग होत असावा.

यानंतर नाळेतील स्पंदन थांबले आहे याची खात्री करून नाभीपासून आठ बोट दूर अंतरावर नाळ रेशमाच्या धाग्याने घट्ट बांधून, मध्ये थोडे अंतर ठेवून, दुसऱ्या धाग्याने पुन्हा बांधायची असते. या दोन्ही बंधनांमध्ये निर्जंतुक वस्त्राने कापायची असते. नाळ लोंबकळत राहू नये आणि चुकूनही ताणली जाऊ नये याकडे लक्ष ठेवणे आवश्यक होय. पू होऊ नये आणि नाळ सुटी झाल्यावर नाभी निरोगी राहावी यासाठी त्या ठिकाणी हळद, लोध्र, ज्येष्ठमध, देवदार वगैरे वनस्पतींची वस्त्रगाळ चूर्ण एकत्र मिसळून तयार केलेले मिश्रण थोडे थोडे भुरभुरणे चांगले होय.

सोने चाखवा
नाळ कापून झाली, की जातकर्मसंस्कारातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट करायची असते ती म्हणजे सुवर्णप्राशन.

विघृष्य धौते दृषदि प्राङ्मुखी लघुना।म्बुना आमथ्य मधुसर्पिभ्यां लेहयेत्कनकं शिशुम्।। ...काश्यप लेहाध्याय

पूर्व दिशेला तोंड करून, स्वच्छ धुतलेल्या सहाणेवर थोडासे मध आणि तूप घेऊन (नुसता मध घेतला तरी चालतो) त्यात शुद्ध सोने किंचित उगाळावे आणि उजव्या हाताच्या अनामिकेने (करंगळीच्या जवळचे बोट) बाळाला चाटवावे. याप्रकारे आयुर्वेदात सहा महिने बाळाला रोज एकदा सोने चाटवायला सांगितले आहे. याने बाळाचे आयुष्य वाढते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, प्रज्ञेचा लाभ होतो, ग्रहादी दुष्ट शक्तींपासून रक्षण होते आणि बालक एकपाठी म्हणजे एकदा ऐकलेले लक्षात ठेवू शकेल एवढे बुद्धिमान होते, असे काश्यपसंहितेत सांगितले आहे. याप्रकारे सोने चाटवल्यानंतर बाळाच्या अंगाला हळुवार हाताने तूप किंवा शतावरी, बला वगैरे औषधांनी सिद्ध केलेले "संतुलन अभ्यंग (सी.-खोबरेल) तेला'सारखे सौम्य आणि वातशामक तेल लावावे.

पहिल्या आंघोळीचे विशेषपण
बाळाची पहिली अंघोळसुद्धा विशेष असते. कारण गर्भाशयात असताना सतत गर्भोदकात राहिल्याने त्याच्या शरीरावर एक प्रकारचा चिकटपणा तयार झालेला असतो. हा चिकटपणा साध्या पाण्याने दूर होत नाही. म्हणून अगोदर अंगाला सैंधव मीठयुक् तेल किंवा तूप लावून पुढील विशेष औषधी द्रव्यांच्या काढ्याने पहिली अंघोळ घालायची असते.

ततः क्षीरीवृक्षकषायेण सर्वगन्धोदकेन तप्ततपनीय रजतनिर्वापणकवोष्णेन कपित्थपत्रकषायेण वा तद्विधेन स्नापयेत्।।
  • क्षीरीवृक्ष म्हणजे वड, उंबर, पिंपळ, पारोसा पिंपळ, पिंपरी यांपैकी मिळतील त्या वृक्षांच्या सालींचा काढा करून त्याने बालकाला स्नान घालावे.
  • सर्वगंधोदक म्हणजे सर्वगंधद्रव्यांनी सुगंधित केलेले जल. दालचिनी, तमालपत्र, छोटी वेलची, नागकेशर, कापूर, कंकोळ, अगरू, शिलाजित लवंग ही सुगंधी द्रव्ये पाण्यात उकळून किंवा मिसळून तयार केलेल्या सुगंधित पाण्याने बालकाला स्नान घालावे.
  • अग्नीच्या साह्याने चांदीचे किंवा सोन्याचे पत्रे गरम करून ते पाण्यात बुडवल्याने कोमट झालेल्या पाण्याने बालकाला स्नान घालावे, किंवा
  • कवठाच्या पानांच्या काढ्याने बाळाला अंघोळ घालावी.
साध्या पाण्यापेक्षा असे सुगंधी, औषधी कोमट पाणी वापरले तर त्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते. शिवाय प्रसूतीमुळे झालेल्या कष्टांचा परिहार होण्यास, वातशमन होण्यासही हातभार लागतो.

पहिले स्तन्यपान
जन्मानंतरचे पहिले स्तन्यपान हे 30-40 मिनिटांच्या आत करणे चांगले असते. स्तन्यपान सुवर्णप्राशनानंतर लगेच दिले तरी चालते किंवा बाळाच्या स्नानानंतर दिले तरी चालते. पण 30-40 मिनिटांत बाळाला प्यायला घेतल्यास बाळ दूध ओढण्याची क्रिया अगदी सहजपणे करू शकते. कारण ही क्रिया बाळाला निसर्गाकडून उपजतच मिळालेली असते. आईचे पहिले दूध हे एक घट्ट रसायन असते ते बाळाच्या पोटात जाणे आवश्यक असते. बाळाने नीट दूध ओढल्यास स्तन्योत्पत्ती लवकर आणि व्यवस्थित व्हायलाही मदत मिळते. बाळंतिणीला दूध कमी आहे अशा गैरसमजातून या वेळात बाळाला बाटली किंवा वाटी-चमच्यातून बाहेरचे दूध पाजले तर बाळ दूध ओढण्याची नैसर्गिक क्रिया टाळू लागते. त्यामुळे पुढे आई आणि बाळ दोघांनाही त्रास होऊ शकतो.

प्रसन्न मनाने पूर्व दिशेला तोंड करून बसावे. उजवा स्तन पाण्याने पुसून घ्यावा आणि बाळाला स्तन्यपानासाठी घ्यावे. स्तन्यपानाची सुरवात ही बालकाच्या आयुष्यातली "शुभ' घटना असल्याने सुश्रुत संहितेत या वेळेला एक मंत्र म्हणायलाही सांगितला आहे.

चत्वारः सागरास्तुभ्यं स्तनयोः क्षीरवाहिनः भवन्तु सुभगे नित्यं बालस्य बलवृद्धये ।।
पयोऽमृतरसं पीत्वा कुमारस्ते शुभानने दीर्घमायुः अवाप्नोतु देवाः प्राश्यामृतं यथा ।। ...सुश्रुत शारीरस्थान

हे सुभगे, बालकाच्या बळाची वृद्धी होण्यासाठी चारही सागर तुझ्या स्तनात क्षीर उत्पन्न करोत. हे शुभानने, ज्या प्रकारे देवता अमृतपान केल्यामुळे दीर्घायू झाल्या, तसेच अमृतस्वरूप असे हे स्तन्य पिऊन तुझे बाळही दीर्घायू होवो. पहिल्या स्तन्यपानाच्या वेळेस कोणी हा मंत्र म्हटल्यास उत्तम, अन्यथा आईने असा भाव तरी मनात ठेवावा.

रक्षाविधान
बालसंस्कारात आयुर्वेदाने विशेष सांगितले, ते म्हणजे रक्षाविधान. नवजात बालक कमालीचे संवेदनशील असते नाजूक असते. नऊ महिने गर्भाशयात राहिल्यानंतर अचानक बाहेरच्या जगात आल्याने त्याच्या वातावरणात कमालीचा फरक पडलेला असतो. उदा. तापमानातील बदल, प्रकाशातला बदल, हवेशी प्रत्यक्ष संपर्क, स्तन्यपानाची सुरवात वगैरे. या सगळ्यांची सवय होईपर्यंत त्याला जपणे फार आवश्यक असते. कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग, अदृष्ट शक्तीची बाधा होऊ नये, उलट बालकाच्या आसपास प्रसन्न वातावरण असावे, यासाठी आयुर्वेदाने खास रक्षाविधान सांगितलेले आहे.

वचा-कुष्ठ-क्षौमकाकहिंगु-सर्षपातसी-लशुन-कणकणिनां रक्षोघ्न समाख्यातानां चौषधीनां पोट्टलिकां बद्ध्वा सूतिकागारस्य उत्तरदेह्यत्याम्अवसृजेत्

वेखंड, कोष्ठकोळिंजन, हिंगाचे खडे, पिवळी मोहरी, जवस, लसणाच्या कळ्या, तांदळाची कणी हे सर्व रेशमी कापडात बांधून पोटली तयार करावी. अशी पोटली बाळंतिणीच्या खोलीच्या दारात, बाळाच्या पाळण्याला, बाळंतिणीच्या पलंगाला वगैरे बांधून ठेवावी.

अग्निः सूतिकागारस्य अभ्यन्तरतो नित्यं स्यात्

बाळ-बाळंतीण असणाऱ्या खोलीत सतत अग्नी तेवत असावा. तिंदूक वृक्षाचे लाकूड तांदळाची कणी जाळून केलेला धूपही अधूनमधून करावा. घरात रोज करावेत असे "संतुलन परिवार कवच' तसेच "संतुलन रक्षा धूप' यासाठी वापरता येतात. माहेश्वर धूप, कुमार धूप वगैरेसुद्धा यासाठी चांगले होत.

अनुपरतप्रदानमलाशीः स्तुतिगीतवादित्रम्अन्नपानविशदम्अनुरक्तप्रहृष्टजनसंपूर्णं तद्वेश् कार्यम्।।

बाळ-बाळंतिणीच्या आसपास सतत मंगलपाठ, आशीर्वचन, स्तुतिपाठ, गीत-वादन चालू असावे. बाळंतिणीचे अन्न-पाणी तसेच तिच्या संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तू स्वच्छ, शुद्ध असाव्यात. त्यांच्या आसपास प्रसन्न व्यक्तींचाच वावर असावा. मंगलपाठ, आशीर्वचन वगैरे गीतवादन ऐकण्यासाठी "स्त्रीसंतुलन' तसेच "गर्भसंस्कार' हे विशेष संगीत ऐकणे उत्तम होय.

ब्राह्मणश्चाथर्ववेदवित्सततमुभयकालं शान्तिं जुहुयात्स्वस्त्ययनार्थं कुमारस्य तथा सूतिकायाः

अथर्ववेद जाणणाऱ्या अधिकारी व्यक्तींनी बाळ-बाळंतिणीच्या कल्याणार्थ स्वस्तिअर्चना, शांतिपाठ सकाळ-संध्याकाळ म्हणाव्यात, विशेष शांती कराव्यात.

जन्मतःच असे उत्तम संस्कार मिळाले, प्रसन्न वातावरणाचा अनुकूल परिणाम मिळाला, की त्यामुळे बालकाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागेल, यात शंका नाही.

1 comment:

  1. Play Slots for free with JSTOR.COM - The Mecca of
    JSTOR.COM. . Your search is 밀양 출장샵 about to 남원 출장마사지 be 과천 출장안마 interrupted by an enormous cluster, 전주 출장안마 with many of the 부천 출장마사지 world's top casino games available for free.

    ReplyDelete